नमस्कार जय गोपाला,
आपण सर्व धोबी समाजाचे लोक संत गाडगेबाबांना आपले आदर्श मानतो. गाडगे बाबांचा जन्म व त्यांना झालेली वैराग्य प्राप्ती ही ऋणमोचण परिसरातील आहे. गाडगेबाबांनी ऋणमोचणच्या यात्रेत लोकांची सेवा केली व पुर्णा नदीवर श्री मुदगलेश्वर महादेव मंदीराजवळ पुर्णानदीवर घाट तयार केला.
ऋणमोचण या गावाचा आणि गाडगे बाबांचा जवळचा संबंध होता. यासंदर्भात आपण गाडगेबाबांच्या चरित्रात सविस्तर वाचू शकतो.
तर अश्या या ऋणमोचण गावी आपण धोबी समाजाचे सर्व लोक दरवर्षी जमतो. मुदगलेश्वराच्या यात्रेत जसे गाडगेबाबा यायचे तसेच आपण सर्व धोबीसमाजाचे लोक एकत्र येतो. एकमेकांना भेटतो. कार्यक्रम होतात आणि सर्व लोक भेटीगाठी घेऊन परत जातो. जाताना परत पुढच्या वर्षी येथेच भेटूया असे बोलून निघतो.
तुम्ही कुणीही असा… म्हणजे कुठेही राहणारे असा, कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक विचारधारेचे असा, त्याविषयी काहीच अडचण नाही. मात्र तुम्ही धोबी समाजाचे सदस्य असाल तर तुम्ही ऋणमोचणला जरूर आलं पाहिजे. येथे या आणि गाडगेबाबांना आठवा. तुम्हाला आवडेल त्या संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. नाहीच आवडलं कुणासोबत सहभागी व्हायला तर एकटंच उभं राहून गाडगेबाबांना आठवा. त्यांचं कार्य आठवा. आणि गाडगेबाबांना स्मरण करून त्यांना शब्द द्या की मी येत्या काळात तुम्ही दाखवलेला पुरोगामी आणि वैचारिक वारसा घेऊन पुढे जाईल. माझ्या आयुष्यात तर सकारात्मक बदल करेलच पण जेवढं जमेल तेवढं आणि जमेल त्या मार्गाने माझ्या समाजाच्या प्रगतीत योगदान देईल.
एवढं झालं की तुमचं ऋणमोचण येणं सफ़ल झालं समजा. गेल्या दशकभरात हा ऋणमोचण सोहळा हळूहळू वाढतोय. आम्ही वाट बघतोय की अशी वेळ कधी येते की तेथे येणारी गर्दी लाखापेक्षा जास्त होते. तो ही दिवस लवकरच येईल. कारण प्रत्येक जण जो एकदा ऋणमोचणला येतो तो जाऊन आपल्या गावी सांगतो की आपल्या समाजाचा एवढा मोठा सोहळा यापुर्वी कधीच पाहिला नाही. त्यामुळे आपला समाज बघायला आणि त्या मोठ्या सोहळ्याचा एक भाग बनायला दरवर्षी आपले समाज बांधव येतात.
आता तुम्ही म्हणाल की दरवर्षी ऋणमोचणला येण्याने प्रगती कशी होईल? तर त्यामागचा विचार येथे स्पष्ट करतो. कसं आहे की तुम्ही एकटे कितीही मोठे झालात किंवा तुम्ही स्वत:ची कितीही प्रगती केली तरी आपला समाज मात्र अद्यापही मागास आहे. एकट्याने एखादी गोष्ट करणे आणि समाजाने एखादी गोष्ट मिळून मिसळून करणे यात खुप मोठा संख्यात्मक आणि गुणात्मक फ़रक असतो. त्यामुळे आपली समाज म्हणून प्रगती व्हायची असेल तर आपण एकत्रीत येणे गरजेचे आहे.
मात्र अन्य सगळ्याच भारतीय समाजाप्रमाणे आपल्या समाजात सुध्दा वेगवेगळ्या संघटना आहेत. या देशपातळीवरच्या व राज्य पातळीवरच्या संघटना एकत्रीत येणे ही जरी काळाची गरजा असली तरी प्रत्यक्षात ते जरा कठीणच दिसते. या सर्वात एक मात्र खुपच चांगली आणि आशादायी गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत संपुर्ण देशभरात आपला धोबी समाज गाडगेबाबांना आपला आदर्श मानतो. त्यामुळे अन्य कुठल्याही विषयावर मतभिन्नता असलेले आपले सर्व संघटनांचे नेते व कार्यकर्ते यांचे गाडगेबाबा आपल्या समाजाचे आदर्श आहेत याविषयावर मात्र प्रचंड एकमत आहे असे दिसून येते. त्यामुळे अन्य कुठल्याच दिवशी किंवा अन्य कुठल्याच जागी जे चित्र बघायला मिळणार नाही ते चित्र ऋणमोचणच्या यात्रेला आपल्याला दिसते, की त्या दिवशी त्या जागी आपला सर्व समाज एकत्रीत येतो. अर्थात तेथेही वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे कार्यक्रम होतात मात्र एका जागी आपण एकत्र येतो ही काय कमी महत्वाची बाब आहे का? त्यामुळे एका जागेवर आपन एकत्रीत येणे सुरू केले म्हणजे याचे पुढचे पाऊल असे असेल की आपण एकासोबत एका दिशेने बघायला सुरूवात करू आणि एकदा हे झाले की मग आपण एकासोबत एका दिशेने म्हणजे प्रगतीच्या दिशेने जाणे सुरू करू. ह्या गोष्टी व्हायला थोडा वेळ लागेल मात्र या मोठ्या गोष्टीची सुरूवात आपल्या समोर होते आहे हे फार महत्वाचे आहे.
त्यामुळे तुम्ही हा लेख आपल्या समाजाच्या वेबसाईटवर म्हणजे https://www.dhobisamaj.com वर वाचत असाल किंवा कुणीतरी फ़ेसबुकवर, व्हॉट्सपवर तुम्हाला पाठवला असेल तर तुम्ही ऋणमोचणला नक्की या. ऋणमोचणच्या यात्रेला कसे यायचे याबाबत माहिती खाली देत आहोत.
ऋणमोचण हे गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यात येते. तुम्ही अमरावतीवरून किंवा दर्यापुर वरून एसटीने येऊ शकता. किंवा दर्यापुर येथून खाजगी ऑटो किंवा खाजगी गाडी करून सुध्दा येऊ शकता.
त्यामुळे ऋनमोचणच्या सोहळ्याला नक्की या. आपल्या समाजाच्या मोठ्या आणि अद्वितीय अश्या सोहळ्याचे भागीदार बना. यासोबतच तुम्हाला सर्वाना एक विनंती आहे की देशभर पसरलेल्या आपल्या समाजाला एका जागेवर आणण्यासाठी आपल्या समाजाची वेबसाईट सुरू केली आहे. त्यावर तुम्ही जरूर सहभागी व्हा. या वेबसाईटवर तुम्ही सदस्य व्हा. इतर लोकांशी ओळख करून घ्या. त्यासोबतच तुमच्या जवळ समाजासाठी काही विचार असतील तर ते सुध्दा तुम्ही या वेबसाईटवर लिहू शकता. तुम्ही मराठी हिंदी इंग्रजी व अन्य भारतीय भाषांमध्ये आपल्या वेबसाईटवर लिहू शकता. तुम्ही कुठल्याही संघटनेचे असाल तर त्या संघटने बद्दल येथे माहिती देऊ शकता. सोबतच तुमच्या जिल्ह्यात किंवा गावात समाजाचा कार्यक्रम झाला असेल तर त्याची माहिती व फोटो येथे देऊ शकता. थोडक्यात आपली https://www.dhobisamaj.com ही वेबसाईट ही फक्त धोबीसमाजाची फ़ेसबुक सारखी साईट आहे. तीचा वापर करून आपल्या समाजातील लोकांशी ओळख वाढवा, एकत्रीत या, व प्रगती करा. धन्यवाद. जय गोपाला.
आपला
विजय सावरकर
मु. जयपुर ता. कारंजा
जि. वाशिम, महाराष्ट्र
व्यक्तीगत संपर्कासाठी मोबाईल – 9325284956
वेबसाईट बाबत मोबाईल. व व्हॉट्सप – 9373996659